चीनचा विरोध लाथाडून रशिया जागला जुन्या मैत्रीला
लडाख सीमेवर भारत आणि चीनदरम्यान तणावाचे वातावरण आहे. याचदरम्यान, रशियाने अत्याधुनिक एअर डिफेन्स मिसाइल सिस्टम ड-400 भारताला लवकरच देण्याचा निर्णय घेतला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे सध्या रशियाच्या दौर्यावर आहेत. यादरम्यान रशियाचे उपपंतप्रधान युरी इवानोव्हिक यांनी हे ब्रह्मास्त्र लवकरच भारताला देण्याचे आश्वासन दिले आहे. यापूर्वी चीनच्या पीपल्स डेली सरकारी वृत्तपत्राच्या माध्यमातून चीन सरकारतर्फे भारताला शस्त्रास्त्र न पुरवण्याची विनंती रशियाला करण्यात आली होती.
भारत आणि रशियादरम्यान विशेष सहकार्य आहे. तसंच भारतासोबतचा करार लवकरच पूर्ण करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं असल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी बैठकीनंतर दिली. रशियाच्या उपपंतप्रधानांशी माझी चर्चा झाली आहे आणि बैठकीतही सकारात्मक चर्चा झाली. करोनासारख्या संकटानंतरही द्विपक्षीय संबंध दृढच आहेत. जे करार करण्यात आले आहेत, ते कायम ठेवण्यात येतील. तसंच बर्याच बाबींमध्ये ही कामं लवकरच पूर्ण केली जातील, असं सांगितलं असल्याची माहिती त्यांनी दिली. ‘हिंदुस्तान टाइम्स’नं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
यापूर्वी पीपल्स डेलीनं रशियानं भारताला शस्त्रास्त्रे देऊ नये अस मत व्यक्त केलं होतं. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या संवेदनशील काळात रशियाने भारताला शस्त्रास्त्रं देऊ नये. आशियातील हे दोन्ही शक्तीशाली देश रशियाचे जवळचे रणनितीक भागीदार आहेत असे पीपल्स डेली या वर्तमानपत्रानं फेसबुकवरील ‘सोसायटी फॉर ओरियंटल स्टडीज ऑफ रशिया’ या ग्रुपवर लिहिलं होतं.
पीपल्स डेली हे चिनी सरकारचे मुखपत्र आहे. रशियाकडून आवश्यक युद्धसाहित्याची खरेदी करुन आपली लष्करी क्षमता अधिक बळकट करण्याचा भारताचा प्रयत्न सुरु असताना चिनी सरकारच्या मुखपत्रातून ही मागणी करण्यात आली होती. आपात्कालिन परिस्थितीत खरेदी करण्यासाठी केंद्राने 500 कोटींचा निधी मंजूर केला आहे. लडाखमधील वादाच्या पार्श्वभूमीवर भारताला तात्काळ 30 फायटर विमाने खरेदी करायची आहेत. यामध्ये मिग 29 आणि सुखोई 30 विमानांचा समावेश आहे असे पीपील्स डेलीने फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
एस-400 ही रशियाची जमिनीवरून हवेत मारा करणारी, लांब पल्ल्याची अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली आहे. त्याला नाटो संघटनेने एसए-21 ग्राऊलर असे नाव दिले आहे. त्याद्वारे 30 किमी उंचीवरील आणि 400 किमी अंतरावरील क्षेपणास्त्रे, विमाने, ड्रोन आदी पाडता येतात. यातील रडार साधारण 600 किमी अंतरावरील 100 लक्ष्यांचा एका वेळी शोध घेऊन त्यातील सहा लक्ष्ये एका वेळी नष्ट करू शकते. त्यासाठी एस-400 प्रणालीत चार प्रकारची वेगवेगळ्या पल्ल्याची क्षेपणास्त्रे आहेत. त्यातील ‘9 एम 96 ई’ हे क्षेपणास्त्र 40 किमीवरील लक्ष्याचा वेध घेऊ शकते. ‘9 एम 96 ई 2’ हे क्षेपणास्त्र 120 किमीवर मारा करू शकते. ‘48 एन 6’ हे क्षेपणास्त्र 250 किमीवर, तर ‘40 एन 6’ हे क्षेपणास्त्र 400 किमीवर मारा करू शकते.